No edit permissions for मराठी

TEXT 40

śrī-bhagavān uvāca
pārtha naiveha nāmutra
vināśas tasya vidyate
na hi kalyāṇa-kṛt kaścid
durgatiṁ tāta gacchati

श्री-भगवान् उवाच-श्री भगवान म्हणाले; पार्थ-हे पृथापुत्रा; न एव-कधीही तसे नाही; इह-या भौतिक जगतात; -कधीच नाही; अमुत्र-पुढील जीवनात; विनाश:-विनाश; तस्य-त्याचा; विद्यते-असते; -कधीच नाही; हि-निश्चितच; कल्याण-कृत्-शुभ कार्यामध्ये रत झालेला;

श्रीभगवान म्हणाले: हे पार्था ! शुभकार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही.

तात्पर्य: श्रीमद्भागवतात नारद मुनी (१.५.१७) व्यासदेवांना पुढीलप्रमाणे सांगतात:

त्यक्त्व स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर्भन्नपक्वोऽथ तेत्ततो यदि
यत्र क्व वाभद्रमभूदमुष्य किं को वार्थ आप्तोऽभजतां स्वधर्मत:।।

          ‘‘जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही. उलटपक्षी अभक्त, पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काहीच लाभ होणार नाही.’’ भौतिक लाभप्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्ये आहेत.          कृष्णभावनेतील आध्यात्मिक प्रगतीकरिता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्माचा त्याग केला पाहिजे. यावर एखादा प्रतिवाद करील की, जर कृष्णभावनेची पूर्णता झाली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल. परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर, त्याची आध्यात्मिकदृष्ट्या तसेच भौतिकदृष्ट्याही हानी होते. शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की, जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची फळे भोगावी लागतात; म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो, त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागतात. परंतु श्रीमद्‌भागवत सांगते की, अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या विहित कर्माचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही. कारण शुभकारक कृष्णभावनेचे विस्मरण कधीच होत नाही आणि कृष्णभावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्णभावनेत संलग्न होतो. उलटपक्षी जो मनुष्य कृष्णभावनाभावित नाही आणि केवळ विहित कर्माचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभ फळ प्राप्त होईलच असे नाही.

          या श्लोकाचे तात्पर्य पुढीलप्रमाणे आहे. मानवसमाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात. पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रियतृप्तीमध्ये रत आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्माच्या तत्त्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात. अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल, या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाहीत. कारण आहार, निद्रा, भय आणि मैथुन या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करीत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंतकालासाठी खितपत पडतात. याउलट जे शास्त्रनियमानुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्णभावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात.

जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी करता येतात –
१) भौतिक सुखसमृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणारे,
२) संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे,
३) कृष्णभावनायुक्त भक्त.
          भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणा-यांच्या पुन्हा दोन श्रेणी करता येतात, सकाम कर्म करणारे आणि इंद्रियतृप्तीची आकांक्षा न करणारे. जे इंद्रियतृप्तीकरिता सकाम कर्मे करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रत किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात, परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करीत नाहीत. ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत. ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्मबुद्धीतून मुक्त होणे हा नाही, त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात. कृष्णभावनाभावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे आणि जो स्वेच्छेने, कृष्णभावनेमध्ये प्रगती करण्याकरिता सर्व शारीरिक दु:खे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते. आणि अष्टांगयोग पद्धतीचा अंतिम उद्देश  कृष्णभावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही.

« Previous Next »