TEXT 2
jñānaṁ te ’haṁ sa-vijñānam
idaṁ vakṣyāmy aśeṣataḥ
yaj jñātvā neha bhūyo ’nyaj
jñātavyam avaśiṣyate
ज्ञानम्-प्रत्यक्ष ज्ञान; ते-तुला; अहम्-मी; स-सहित; विज्ञानम्-दिव्य ज्ञान; इदम्-हे; वक्ष्यामि-मी सांगेन; अशेषतः-पूर्णपणे; यत्-जे; ज्ञात्वा-जाणल्यावर; न-नाही; इह-या जगतात; भूय:-पुन्हा किंवा अधिक; अन्यत्-याशिवाय दुसरे अधिक; ज्ञातव्यम्-जाणण्यायोग्य; अवशिष्यते-राहते.
प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही.
तात्पर्य: पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतनतत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान, यांचा समावेश होतो. हेच दिव्य ज्ञान आहे. भगवंतांना अर्जुनाला उपर्युक्त ज्ञान सांगावयाचे आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा अंतरंग भक्त आणि सखा होता. चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे. प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवद्भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत, हे जाणण्याइतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. वेद सांगतात कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति (मुण्डकोपनिषद १.३)