No edit permissions for मराठी

TEXT 3

manuṣyāṇāṁ sahasreṣu
kaścid yatati siddhaye
yatatām api siddhānāṁ
kaścin māṁ vetti tattvataḥ

मनुष्याणाम्-मनुष्यांमध्ये; सहस्त्रेषु-सहस्रावधी; कश्चित्-एखादाच कोणी;यतति-प्रयत्न करतो; सिद्धये-सिद्धी प्राप्त करण्यासाठी;यतताम्-असा प्रयत्न करणा-यांपैकी; अपि-खरोखर; सिद्धानाम्-सिद्धी प्राप्त केलेल्यांपैकी; कश्चित्—कोणी तरी; माम्—मला; वेत्ति-जाणतो; तत्त्वतः-तत्त्वतः.

सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणा-या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो.

तात्पर्य: मनुष्यांचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परम सत्य म्हणजे काय? हे जाणण्याइतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते. सामान्यतः मानवप्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी पशुवृत्तींमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये स्वारस्य असते. आत्मा, परमात्मा आणि त्यांची अनूभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योगपद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद, यासंबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूसाठी भगवद्गीतेचे पहिले सहा अध्याय आहेत. तथापि, केवळ कृष्णभावनाभावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना, निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत, पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगिजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्वज्ञानींचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत, कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे.

          श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परम कारण, आदिपुरुष श्री गोविंद आहेत. ईश्र्वर: परम: कष्ण: सच्चिदानन्द विग्रह:। अनादिरादिर्गोविन्द: सर्वकारणकारणम्. अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले की, भक्तिमार्ग हा अत्यंत सोपा आहे तरी ते भक्तिमार्गाचे आचरण करू शकत नाहीत. अभक्त मनुष्य, भक्तिमार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करतात? वस्तुतः भक्तिमार्ग हा इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल, परंतु शास्त्रसंमत विधिविधानांनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्तिमार्गावरून भ्रष्ट होतात. श्रील रूप गोस्वामी भक्तिरसामृतसिंधूमध्ये (१.२.१०१) लिहितात:

श्रृति स्मृतिपराणादि पञ्चरात्रविधिं विना।
ऐकान्तिकी हरेर्भक्तिरूत्पातायैव कल्पते ।।

          ‘‘उपनिषद, पुराण, नारद पञ्चरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून जी भगवद्भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे.’’

          ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे, यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही. मोठमोठ्या देवतांनासुद्धा कधीकधी श्रीकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण होतो. (मुह्यन्ति यत्सूरय:) मांतु वेद न कश्न भगवंत सांगतात की, 'मला तत्वतः कोणीही जाणत नाही' आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर स महात्मा सुदुर्लभ: 'असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.' म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवद्भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना 'तत्वतः'जाणू शकत नाही, मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तावर असीम कृपा असल्याकारणाने, केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचे कारण असणारे, सर्वशक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे, बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणा-या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्प ज्ञान होऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वतः जाणू शकतात, म्हणून भक्तिरसामृतसिंधूमध्ये (१.२.२३४) सांगण्यात आले आहे की:

अत: श्रीकृष्णनामादि न भवेद्रग्राह्यमिन्द्रियै:।
सेवोन्मुखे हि जिह्वादौ स्वयमेव स्फुरत्यद:

          ‘‘अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही, परंतु भक्तांनी केलेल्या भगवंतांच्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रकट होतात.’’

« Previous Next »