No edit permissions for मराठी

TEXT 23

antavat tu phalaṁ teṣāṁ
tad bhavaty alpa-medhasām
devān deva-yajo yānti
mad-bhaktā yānti mām api

अन्त-वत्-नश्वर किंवा अनित्य; तु-परंतु; फलम्-फळ; तेषाम्-त्यांचे; तत्-ते; भवति- होते; अल्प-मेधसाम्‌-अल्पबुद्धीचे; देवान्-देवतांना; देव-यजः-देवतांचे उपासक; यान्ति -जातातः मत्-माझे; भक्ताः-भक्त; यान्ति-जातात; माम्-मला; अपि-सुद्धा.

अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात.

तात्पर्य: भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की, देवतांची उपासना करणा-या मनुष्याला भगवत्प्राप्ती होऊ शकते. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, देवतांचे उपासक हे, निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात. उदाहरणार्थ, सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्रोपासक चंद्रलोकाची प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकांचवी प्राप्त होते. कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही. ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे, कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, देवोपासक हे भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकांत जातात, परंतु भगवद्भक्त हा प्रत्यक्ष भगवद्धामाची प्राप्ती करतो.

          या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की, जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत, तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे. परंतु देवोपासक हे अल्पबुद्धी आहेत, कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते. त्यांच्यापैकी काही लोक इतके मूख असतात, की ते म्हणतात, शरीराला अनेक भाग असतात, आणि त्यांना अन्नपुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात पण हे उत्तर समर्पक नाही. कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्नपुरवठा करू शकतो का? त्यांना माहीत नसते की, या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धा आहे.

          केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही तर सामान्य जीवसुद्धा भगवंतांचे अशं आहेत. श्रीमद्भागवतात सांगण्यात आले आहे की, ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक आहे, क्षत्रिय हे बाहू आहेत, वैश्य हे कटी तथा शूद्र हे पाय आहेत आणि हे सर्वजण विविध कार्ये करतात. आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की, जीव आणि देवता दोघेही भगवंतांचेच अंश आहेत तर त्याचे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे. परंतु जर त्याने हे जाणले नाही तर त्याला देवदेवता निवास करणा-या विविध लोकांची प्राप्ती होते. भगवद्भक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते.

          देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात, कारण या भौतिक जगतातील लोक, देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात. म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणिक असतात आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात. कृष्णभावनेद्वारे भगवद्भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते. म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो, भगवंत हे अनंत आहेत, त्यांची कृष्णा, कृपा अपार आहे आणि म्हणून भगवंतांची आपल्या शुद्ध भक्तावर निःसीम कृपा असते.

« Previous Next »