No edit permissions for मराठी

TEXT 26

vedāhaṁ samatītāni
vartamānāni cārjuna
bhaviṣyāṇi ca bhūtāni
māṁ tu veda na kaścana

वेद-जाण; अहम्-मी; समतीतानि-भूतकाळात झालेले; वर्तमानानि-वर्तमानकाळी चाललेले; -आणि; अर्जुन-हे अर्जुन; भविष्याणि-भविष्यकाळात घडणारे; -सुद्धा; भूतानि-सर्व जीव; माम्—मला; तु—परंतु, वेद—जाणतात;—नाही, कश्चन—कोणीही.

हे अर्जुन! मी, पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमानकाळात घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो; परंतु मला कोणीही जाणीत नाही.

तात्पर्य: या ठिकाणी साकार आणि निराकार वादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. मायावाद्यांच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवंतांचे श्रीकृष्ण रूप हे प्राकृत अर्थात, माया असले असते तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणेच देहातर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते. प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही. तो आपल्या भविष्यकाळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही तसेच त्याला आपल्या वर्तमानकाळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही आणि म्हणून तो भूत, वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य, भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत, वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही.

          भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की, साधारण मनुष्याला भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते; परंतु ते मात्र पूर्वी घडलेले सर्व काही, वर्तमान काळी घडत असणारे आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही पूर्णपणे जाणतात. चौथ्या अध्यायात आपण पाहिले आहे की, भगवान श्रीकृष्णांना लाखो वर्षांपूर्वी आपण सूर्यदेव विवस्वानला गीता सांगितल्याचे आठवते. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयात परमात्मारूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात. परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले तरी, अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असला तरी, श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही. निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर नश्वर नाही. भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे आहे. भौतिक जगतात आपण सूर्य, मेघ तसेच नक्षत्रांना आणि ग्रहांना पाहतो. आकाशात या सर्वांना ढग तात्पुरते आच्छादित करतात, परंतु हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते, पण वास्तविकपणे सूर्य, चंद्र, तारे हे झाकलेले नसतात. त्याचप्रमाणे माया ही भगवंतांना आच्छादित करू शकत नाही. आपल्या अंतरंगा शक्तीमुळे ते अल्पज्ञानी मनुष्यांना प्रकट होत नाहीत. या अध्यायाच्या तिस-या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यांपैकी थोडेच लोक या मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हजारो सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणतो. जरी त्याला निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरी त्याला कृष्णभावनाभावित झाल्यावाचून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही.

« Previous Next »