No edit permissions for मराठी

TEXT 4

bhūmir āpo ’nalo vāyuḥ
khaṁ mano buddhir eva ca
ahaṅkāra itīyaṁ me
bhinnā prakṛtir aṣṭadhā

भूमिः-पृथ्वी; आपः-पाणी; अनलः-अग्नी; वायुः-वायूः खम्-आकाश; मनः-मन; बुद्धिः-बुद्धी; एव-निश्चितच; -आणि; अहङ्कारः--मिथ्या अहंकार; इति-याप्रमाणे; इयम्-ही सर्व; मे-माझ्या; भिन्ना-भिन्न किंवा विभागलेली; प्रकृति:-शक्ती; अष्टधा-आठ प्रकारच्या

पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत.

तात्पर्य: भगवत्-विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूपस्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे, भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात:

विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषाख्यान्यथो विदु:
एकं तु महत: स्रष्ट्व द्वितीयं त्वण्डसंस्थितम्‌ ।
तृतीयं सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते।।

          ‘‘प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप तीन विष्णुरूपे धारण करते. पहिले महाविष्णू हे रूप महत्-तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे गर्भोदकशायी विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते. तिसरे क्षीरोदकशायी विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते. परमात्मा हा अणूमध्येही उपस्थित असतो. जो कोणी या तीन विष्णुरूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो.’’

          हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या तीन विष्णू रूपांद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत्-तत्व (श्रीकृष्ण) ज्ञात नाही त्याला वाटते की, हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष, निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोक्ते आहेत. भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे, नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदिकारण असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत. निर्विशेषवाद्यांचे लक्ष्य, ब्रह्मज्योती, ही सुद्धा वैकुंठ लोकांतील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परमलक्ष्य म्हणून स्वीकार करतात. परमात्मारूपही क्षीरोदकशायी विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे. भगवद्धामात परमात्मारूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही. म्हणून वास्तविक परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. ते सर्वशक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत.

          वर सांगितल्याप्रमाणे, भौतिक शक्तीमध्ये आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत. यांपैकी प्रथम म्हणजे,पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश होत. यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यांमध्ये, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच इंद्रियविषयांचा समावेश करण्यात आला आहे. भौतिक विज्ञानात या दहा तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो, परंतु मन, बुद्धी, अहंकार या इतर तीन तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणा-या तत्वज्ञान्यांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम, भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार-'मी'आणि'माझे' हा सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणा-या दहा इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिकसृष्टी किंवा महत्-तत्वाचा निर्देश करते. म्हणून भगवंतांच्या आठ भिन्न शक्तींद्वारे, भौतिक जगताची चोवीस तत्वे अभिव्यक्त होतात. ही चोवीस तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्त्वज्ञानाची विषयवस्तू आहे. मूलत: ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात; परंतु अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञान्यांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हजणे भगवानकृष्णांच्या कवेळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय.

« Previous Next »