No edit permissions for मराठी

TEXT 5

apareyam itas tv anyāṁ
prakṛtiṁ viddhi me parām
jīva-bhūtāṁ mahā-bāho
yayedaṁ dhāryate jagat

अपरा-कनिष्ठ किंवा अपरा; इयम—ही; इतः—याव्यतिरिक्त; तु—परंतु, अन्याम्—अन्य; प्रकृतिम्-प्रकृती किंवा शक्ती; विद्धि-जाणण्याचा प्रयत्न कर; मे-माझ्या; पराम्-परा किंवा श्रेष्ठ; जीव-भूताम्—जीव अंतभूत असलेली, महाबाहो—हे महाबाहू अर्जुना; यया—ज्याद्वारे; इदम्—हे; धार्यते—उपयोग केला जातो; जगत्—भौतिक जगत.

हे महाबाहू अर्जुना! याव्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ, भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात.

तात्पर्य: या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जीव हे भगवंतांची परा प्रकृती आहेत. अपरा प्रकृती ही, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आकाश, मन, बुद्धी, अहंकार या विविध तत्वांद्वारे प्रकट होते. भौतिक प्रकृतीचे स्थूल (पृथ्वी इ.) आणि सूक्ष्म (मन इ.) हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात. विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तीचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्यावाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते. शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंतांप्रमाणेच शक्तिमान नसतात. भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद्भागवतात (१०.८७.३०) पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

अपरिमिता धुरवस्तनुभृतो यदि सर्वगता
स्तर्हि न शास्यतेति नियमो ध्रुव नेतरथा।
अजनि च यन्मयं तदविमुच्य नियन्तृ भवेत्‌
सममनुजानतां यदमतं मतदृष्टतया।।

          ‘‘हे भगवंत! जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या आधिपत्याला शरण जाणे होय आणि या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात. जीव केवळ आपल्या स्वरुपस्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात’’.

          भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे, कारण गुणात्मकदृष्ट्या जीव हे भगवंतांसारखेच आहेत; परंतु परिमाणात्मकदृष्ट्या ते भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाहीत. स्थूल आणि सूक्ष्म अपरा शक्तीचा उपभोग करीत असताना, परा शक्तीला (जीव) आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते. असे विस्मरण त्याला जड तत्त्वाच्या प्रभावामुळे होते. परंतु जेव्हा जीव, भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तिपदाची प्राप्ती होते. मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की, मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत. जेव्हा जीव, सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पनेसहित, सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनांतून मुक्त होतो, तेव्हा त्याला आपल्या स्वरूपस्थितीचा साक्षात्कार होतो. म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की, गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहेत आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते तेव्हा ती पूर्णपणे कृष्णभावनाभावित किंवा मुक्त होते.

« Previous Next »