TEXT 20
trai-vidyā māṁ soma-pāḥ pūta-pāpā
yajñair iṣṭvā svar-gatiṁ prārthayante
te puṇyam āsādya surendra-lokam
aśnanti divyān divi deva-bhogān
त्रै-विद्या:-तीन वेद जाणणारे; माम्-मला; सोम-पा:-सोमरसपान करणारे; पूत-पवित्र झालेले; पापाः-पापांपासून; यज्ञैः-यज्ञाद्वारे; इष्ट्रा-पूजन करून; स्वः-गतिम्—स्वर्गारोहणाचा मार्ग; प्रार्थयन्ते-प्रार्थना करतात; ते-ते; पुण्यम्-पुण्य; आसाद्य-प्राप्त करून; सुर-इन्द्र-इंद्राचा; लोकम्—लोक; अश्नन्ति—उपभोग घेतात; दिव्यान्—दिव्य;दिवि—स्वर्गामध्ये; देव-भोगान्— देवांचे भोग.
वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात.
तात्पर्य: त्रैविद्या: शब्द म्हणजे साम, यजुः आणि ऋग्र हे तीन वेद होय. ज्या ब्राह्मणाने या तीन वेदांचे अध्ययन केले आहे त्याला त्रिवेदी असे म्हटले जाते. या तिन्ही वेदांचे ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते. दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाही म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की, त्रिवेदींचे ध्येय म्हणजे मीच आहे. वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवद्भक्तीमध्ये युक्त होतात. भक्तियोगाचा प्रारंभ हरेकृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्याचा प्रयत्न करण्याने होतो. दुर्दैवाने केवळ वेदाध्ययन करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवतांप्रीत्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात. अशा प्रयत्नांद्वारे देवोपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणांतून मुक्त होतात आणि त्यामुळे असे लोक महर्लोक, जनलोक, तपोलोक इत्यादी उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात. जो अशा लोकामध्ये वास करतो त्याला या पृथ्वीपेक्षा लक्ष लक्ष पटीने अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रियभोग करता येतो.