No edit permissions for मराठी

TEXT 15

svayam evātmanātmānaṁ
vettha tvaṁ puruṣottama
bhūta-bhāvana bhūteśa
deva-deva jagat-pate

स्वयम्-स्वयं; एव-खचितच; आत्मना-आपणच; आत्मानम्-आपल्याला; वेत्थ-जाणता; त्वम्-तुम्ही; पुरुष-उत्तम-पुरुषोत्तम; भूत-भावन-हे सर्व जीवांचे उत्पत्तिकर्ता; भूत-ईश-सर्व जीवांचे स्वामी; देव-देव-हे देवाधिदेव; जगत्-पते-संपूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी, हे जगत्पते.

हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भुतेश, देवाधिदेव, हे जगत्पते! खरोखर, तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता.

तात्पर्य: अर्जुन आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे जे भक्तियोगाद्वारे भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत तेच केवळ श्रीकृष्णांना जाणू शकतात. नास्तिक किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. भगवंतांपासून मनुष्याला दूर नेणारा तर्कवाद म्हणजे एक गंभीर पाप आहे आणि जो श्रीकृष्णांना जाणत नाही त्याने भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये. भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णांचे उपदेश आहेत तसेच हे कृष्णविज्ञान असल्याकारणाने अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांकडून हे जाणून घेतले पाहिजे. नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीता समजून घेऊ नये.

श्रीमद्भागवतात (१.२.११) सांगितल्याप्रमाणे

वदन्ति तत्तत्वविदस्तत्वं यञ्ज्ञानमद्वयम्‌।
ब्रह्मेति परमात्मेति भगवनिति शब्द्यते।।

          परम सत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या तीन रूपांमध्ये होतो. परम सत्याच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत मनुष्याला भगवत्प्राप्ती होते. एखादी साधारण व्यक्ती किंवा अंतर्यामी परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झालेला मुक्तात्माही परम सत्याचे स्वरुप जाणू शकेलच असे नाही. म्हणून असे लोक भगवद्‌गीतेतील श्लोकाद्वारे परमपुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण हे श्लोक स्वतः परमपुरुष श्रीकृष्णांनी सांगितले आहेत. कधी कधी निर्विशेषवादी, श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांच्या अधिकृततेचा स्वीकार करतात. तथापि, अनेक मुक्तात्मेही श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाहीत. म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित आहे. इतक्या स्पष्टीकरणानेही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता असल्याचे मनुष्य जाणू शकत नाही. म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणून संबोधित आहे आणि जरी त्यांना सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी तो त्यांना परमनियंत्रक म्हणून जाणू शकेलच असे नाही यास्तव त्यांना भूतेश असे संबोधण्यात आले आहे. मनुष्याने जरी श्रीकृष्णांना सर्व जीवांचा परमनियंत्रक म्हणून जाणले तरी तो त्यांना सर्व देवांचे आदिकारण म्हणून जाणू शकणार नाही. यास्तव या ठिकाणी त्यांना देवदेव असे संबोधण्यात आले आहे आणि मनुष्याने जरी त्यांना देवाधिदेव म्हणून जाणले तरी तेच अस्तित्वातील सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे तो जाणू शकणार नाही. म्हणून त्यांना या ठिकाणी जगत्पती असे संबोधण्यात आले आहे. याप्रमाणे अर्जुनाच्या अनुभूतीवरून या श्लोकामध्ये कृष्णतत्त्व प्रस्थापित करण्यात आले आहे आणि श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिह्मांचे अनुसरण केले पाहिजे.

« Previous Next »