No edit permissions for मराठी

TEXT 2

na me viduḥ sura-gaṇāḥ
prabhavaṁ na maharṣayaḥ
aham ādir hi devānāṁ
maharṣīṇāṁ ca sarvaśaḥ

-कधीच नाही ; मे-माझे; विदुः-जाणतात; सुर-गणाः-देवता; प्रभवम्-उद्गम अथवा ऐश्वर्यं ; -कधीच नाही; महा-ऋषयः-महर्षिगण; अहम्—मी, आदिः-आदी; हि-निश्चितच; देवानाम्-देवतांचे; महा-ऋषीणाम्-महर्षीचा; -सुद्धा; सर्वशः-सर्वं प्रकारे.

माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही तसेच महर्षीनाही कळत नाही, कारण सर्वप्रकारे देवतांचे आणि महर्षीचेही मूळ मीच आहे.

तात्पर्य: ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच स्वयं परमेश्वर आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत. या ठिकाणी स्वत: भगवंत म्हणतात की, 'मीच सर्व देवदेवतांचे आणि महर्षीचे आदिकारण आहे.' मोठमोठ्या देवदेवता आणि महर्षीसुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्यांचे स्वरुपही समजे शकत नाही. मग या सूक्ष्म ग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे? कोणीही जाणू शकत नाही की, कशासाठी भगवंत मानवसदृश रूपात या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करतात. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की, श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही. देवदेवता आणि महर्षींनी सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच ठरले आहेत. श्रीमद्‌भागतातही स्पष्टपणे म्हटले आहे की, मोठमोठ्या देवतासुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत. ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व निराकारवादाचा विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात, भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा कोणत्या तरी वस्तूविषयी निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने  कल्पनाविलास करू शकतात. पंरतु अशा मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही.

          या ठिकाणी भगवंत अप्रत्यक्षपणे म्हणतात की, जर कोणाला परम सत्य जाणून घ्यावयाचे असेल तर 'पाहा मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे. मीच परम सत्य आहे. 'मनुष्याने हे जाणणे आवश्यक आहे. स्वयं उपस्थित असणा-या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते विद्यमान असतातच. सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद्भगवद्गीतेतील आणि श्रीमद्भागवतातील उपदेशांचे अध्ययन करून, वस्तुतः जाणू शकतो. भगवंतांच्या अपरा प्रकृतीच्या अधीन असणा-या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते, परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्यावस्थेची प्राप्ती करू शकत नाही, तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही.

          अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूपस्थिती जाणू शकत नाहीत. यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहैतुकी कृपेमुळे अवतरित होतात. भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की, 'निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात की, अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्णच आहेत. भगवद्भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्मस्वरूपाची पर्वा करीत नाहीत, कारण आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळे ते तात्काळ भगवंतांना शरण जातात आणि श्रीकृष्णांच्या अहैतुकी कृपेमुळेच त्यांना श्रीकृष्णांचे ज्ञान होते. भक्ताव्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि परतत्वही आहेत, याचा महर्षीसुद्धा स्वीकार करतात.

« Previous Next »