TEXTS 3-4
ye tv akṣaram anirdeśyam
avyaktaṁ paryupāsate
sarvatra-gam acintyaṁ ca
kūṭa-stham acalaṁ dhruvam
sanniyamyendriya-grāmaṁ
sarvatra sama-buddhayaḥ
te prāpnuvanti mām eva
sarva-bhūta-hite ratāḥ
ये-जे; तु-परंतु; अक्षरम्-इंद्रियातीत; अनिर्देश्यम्-अमर्याद; अव्यक्तम्-अव्यक्त; पर्युपासते-उपासना करण्यामध्ये संलग्न; सर्वत्र-गम्-सर्वव्यापी; अचिन्त्यम्-अचिंत्य; च-सुद्धा; कूट-स्थम्-बदलरहित; अचलम्—अचल, ध्रुवम्—स्थित; सन्नियम्य-संयमन करून; इन्द्रिय-ग्रामम्-सर्व इंद्रिये; सर्वत्र-सर्वत्र; सम-बुद्धयः-समबुद्धी असणारे; ते-ते; प्राप्नुवन्ति-प्राप्त करतात; माम्-मला; एव-निश्चितपणे; सर्व-भूत-हिते-सर्व प्राण्यांच्या हितार्थ;रताः-संलग्न झालेले.
परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून, अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात.
तात्पर्य: जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करीत नाहीत, परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच उद्दिष्टाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतात, त्यांनासुद्धा शेवटी कृष्णप्राप्ती होते. 'अनेकानेक जन्मांनंतर ज्ञानी मनुष्य, 'वासुदेव' हेच सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो.' अनेकानेक जन्मांनंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत्प्राप्ती करावयाची असेल तर त्याने इंद्रियसंयमन करणे, प्रत्येकांची सेवा करणे आणि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गर्भितार्थ असा आहे की, त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे; अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी ब-याचदा खूप तपस्या करावी लागते.
अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशू यांमध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहात नाही तर केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे.