TEXT 27
jātasya hi dhruvo mṛtyur
dhruvaṁ janma mṛtasya ca
tasmād aparihārye ’rthe
na tvaṁ śocitum arhasi
जातस्य - जो जन्मला आहे त्याचा; हि-निश्चितच; ध्रुव:- वस्तुस्थिती, वास्तविक सत्य; मृत्यु:- मृत्यू; ध्रुवम्-हेही निश्चित सत्य आहे; जन्म - जन्म; मृतस्य- जो मृत झाला आहे; च- सुद्धा; तस्मात् - म्हणून; अपरिहार्ये - जे टाळता येत नाही; अर्थे - अशा बाबतीत; न- करू नको; त्वम् - तू; शोचितुम - शोक करणे; अर्हसि-योग्य आहे.
जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यपालनात तू शोक करणे योग्य नाही.
तात्पर्य : मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एका कालावधी संपला की,दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याप्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म-मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत, पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानवसमाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे.
भगवंतांची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्यपालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दु:खी आणि भयभीत का व्हावे? कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते. कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपल्या योग्य कर्तव्यपालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि याप्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते.