No edit permissions for मराठी

TEXT 18

udārāḥ sarva evaite
jñānī tv ātmaiva me matam
āsthitaḥ sa hi yuktātmā
mām evānuttamāṁ gatim

उदारा:-उदार; सर्वे-सर्व; एव-खचितच; एते-हे; ज्ञानी-ज्ञानवान; तु-परंतु; आत्मा एव- माझ्याप्रमाणेच; मे-माझे; मतम्-मत; आस्थितः-स्थित झालेला; सः-तो; हि-खचितच; युक्त-आत्मा-भगवद्भक्तीमध्ये युक्त; माम्-माझ्यामध्ये; एव-निश्चितच; अनुक्तमाम्-सर्वोत्तम; गतिम्-लक्ष्य.

निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत; परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे, त्याला मी माझ्या स्वत:प्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी, सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची, प्राप्ती करतो.

तात्पर्य: ज्या भक्तांना पूर्ण ज्ञान नाही ते भगवंतांना प्रिय नाहीत असे नाही. भगवंत म्हणतात की, हे सर्व भक्त उदार आहेत, कारण जो, मग तो कोणत्याही हेतूने असो, भगवंतांकडे येतो त्याला महात्मा म्हटले जाते. ज्या भक्तांना भगवद्भक्तीच्या बदल्यात काही लाभ व्हावा अशी इच्छा असते त्यांचाही भगवंत स्वीकार करतात, कारण त्यांच्यामध्ये स्नेहाचे आदानप्रदान होते. स्नेहामुळे ते भगवंतांकडे भौतिक लाभाची याचना करतात आणि जेव्हा त्यांना लाभप्राप्ती होते तेव्हा ते इतके तृप्त होतात की, ते भक्तीमध्येही उन्नत होतात. परंतु जो भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त असतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो, कारण प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो. असा भक्त, भगवंतांच्या निकट सान्निध्यावाचून किंवा भगवंतांची सेवा केल्यावाचून क्षणभरही राहू शकत नाही. तसेच भगवंतांनाही आपला भक्त अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळे राहवत नाही.

          श्रीमद्भागवतात (९.४.६८) भगवंत सांगतात की:

साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम्‌।
मदन्यते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि।

          ‘‘भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे. भक्त माझ्याव्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाहीत आणि मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही. मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो. पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त, भगवद्भक्तीपासून कधीच दूर राहात नाहीत आणि म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत.’’

« Previous Next »