TEXT 25
nāhaṁ prakāśaḥ sarvasya
yoga-māyā-samāvṛtaḥ
mūḍho ’yaṁ nābhijānāti
loko mām ajam avyayam
न-तसेच नाही; अहम्-मी; प्रकाश:-प्रकट; सर्वस्य-सर्वांना; योग-माया-अंतरंगा शक्तीने; समावृत:-आच्छादित झालेला; मूढ:-मूर्ख; अयम्-या; न-नाही; अभिजानाति-जाणू शकतातः लोकः-मनुष्य: माम्-मला; अजम्-अन्मा; अव्ययम्-अविनाशी,
मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत.
तात्पर्यः कोणी असा युक्तिवाद करतील की, ज्याअर्थी श्रीकृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते आणि सर्वांना दृश्य होते तर मग ते आता सर्वांना प्रकट का होत नाहीत? परंतु वस्तुतः ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते. जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती. कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपालने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे समर्थन केले आणि श्रीकृष्ण हेच स्वतः भगवंत असल्याचे घोषित केले. त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्याच लोकांना ते स्वत: भगवंत असल्याचे माहीत होते; परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते. श्रीकृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की, विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त, इतर सर्व मनुष्य त्यांना आपल्याप्रमाणेच साधारण समजतात. ते केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट होतात. परंतु इतर निबुर्द्ध अभक्तांसाठी ते आपल्या अंतरंगा शक्तीने आच्छादितच राहतात.
श्रीमद्भागवतातील (१.८.१९) कुंतिदेवीच्या प्रार्थनेमध्ये सांगण्यात आले आहे की, भगवंत हे योगमायेच्या पडद्याने आच्छादित असतात आणि म्हणून साधारण मनुष्य त्यांना जाणू शकत नाहीत. या योगमायारूपी पडद्याबद्दल ईशोपनिषदामध्येही (मंत्र १५) सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी भक्त प्रार्थना करती की:
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्
तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधमयि दृष्टये।।
‘‘हे प्रभो ! तुम्ही, संपूर्ण विश्वाचे पालनकर्ते आहात आणि तुमची भक्तीपूर्ण सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे. म्हणून मी तुमची प्रार्थना करतो की, तुम्ही माझे सुद्धा पालन करा. तुमचे तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारे हे देदीप्यमान तेज कृपया दूर करा.' भगवंतांचे सच्चिदानंद स्वरूप हे ब्रह्मज्योतीच्या अंतरंगा शक्तीने आवृत असते आणि यामुळेच अप्लज्ञ निर्विशेषवाद्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नाही.
श्रीमद्भागवतातही (१०.१४.७) ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात, 'हे भगवंत!! हे परमात्मन्! हे योगेश्वर! तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल? तुम्ही आपल्या अंतरंगा शक्तींचा नित्य विस्तार करीत आहात आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही. विद्वान वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अणुरचनेचेही परीक्षण करू शकतील, परंतु तुम्ही त्यांच्या समोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे केवळ अजन्माच नव्हे तर अव्यय किंवा अविनाशीही आहेत. त्यांचे रूप हे सचिदानंद आहे आणि त्यांच्या सर्व शक्ती अविनाशी आहेत.