TEXT 27
icchā-dveṣa-samutthena
dvandva-mohena bhārata
sarva-bhūtāni sammohaṁ
sarge yānti paran-tapa
इच्छा-इच्छा; द्वेष-आणि द्वेष; समुत्थेन-उद्भवणा-या; द्वन्द्व-द्वंद्व;मोहेन-मोहामुळे; भारत-हे भारता; सर्व-सर्व; भूतानि—जीव; सम्मोहम्-मोह किंवा भ्रमामध्ये; सर्गे-जन्म घेताना; यान्ति-जातात; परन्तप-हे परंतप.
हे परंतपः भारता! इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणा-या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे, सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात.
तात्पर्य: शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूपस्थिती आहे. या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो, तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. इच्छा आणि द्वेषरूपी द्वंद्वामध्ये मायाशक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य, भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की, भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात, परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की, भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे. परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. असे मनुष्य, मान-अपमान, सुख-दुःख, स्त्री-पुरुष, शुभ-अशुभ, हर्ष-विषाद इत्यादी द्वंद्वांत राहतात आणि त्यांना वाटते की, 'ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे.' ही सारी मोहित करणारी द्वद्वे आहेत. जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत.