TEXT 25
maharṣīṇāṁ bhṛgur ahaṁ
girām asmy ekam akṣaram
yajñānāṁ japa-yajño ’smi
sthāvarāṇāṁ himālayaḥ
महा-ऋषीणाम्-महर्षीमध्ये; भूगुः-भूगू: अहम्-मी आहे; गिराम्-वाणी, ध्वनीमध्ये; अस्मि-मी आहे; एकम् अक्षरम्-प्रणव, ॐकार; यज्ञानाम्-यज्ञांमध्ये; जप-यज्ञः-जप; अस्मि-मी आहे; स्थावराणाम्-अचल पदार्थामध्ये; हिमालयः-हिमालय पर्वत.
महर्षीमध्ये भूगूमी आहे, ध्वनीमध्ये दिव्य ॐकार मी आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थामध्ये हिमालय पर्वत मी आहे.
तात्पर्य: ब्रह्मांडातील प्रथम जन्मलेला जीव, ब्रह्मदेव याने विविध योनींच्या विस्ताराकरिता अनेक पुत्र निर्माण केले. या पुत्रांपैकी भूगू सर्वांत सामथ्र्यशाली ऋषी आहेत. सर्व दिव्य ध्वनींमध्ये अॅंकार हे भगवान श्रीकृष्णांचे रूप आहे. सर्व यज्ञांमध्ये हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे। या महामंत्राचा जपयज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे परमपवित्र रूप आहे. कधी कधी पशुयज्ञांचे विधान केलेले असते; परंतु हरेकृष्ण महामंत्राच्या यज्ञामध्ये हिंसेचा प्रश्न मुळीच उद्भवत नाही. हा यज्ञ अत्यंत सुलभ आणि अत्यधिक शुद्ध आहे. सर्व ग्रहलोकांमध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचेच रूप आहे म्हणून जगातील सर्वांत उंच असा हिमालय पर्वत सुद्धा श्रीकृष्णांचेच रूप आहे. पूर्वीच्या श्लोकात मेरू पर्वताचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु मेरू पर्वत हा कधी कधी हलविता येतो, पण हिमालय पर्वत हा अचल आहे. म्हणून हिमालय पर्वत हा मेरू पर्वताहूनही श्रेष्ठ आहे.