No edit permissions for मराठी

अध्याय आठवा

अक्षरब्रह्मयोग(भगवत्प्राप्ती)

TEXT 1: अर्जुनाने विचारले: हे पुरुषोत्तम, हे भगवन्!ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? आणि देवता कोण आहेत? हे कृपया मला सांगा.

TEXT 2: हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात?

TEXT 3: श्रीभगवान म्हणाले: अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणा-या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात.

TEXT 4: हे देहाभृतांवर! निरंतर परिवर्तनशील असणा-या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे चंद्र-सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणा-या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी, पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाञ्च अधियज्ञ ( यज्ञांचा अधिष्ठाता ) असे म्हटले जाते.

TEXT 5: आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो, तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो. यात मुळीच संशय नाही.

TEXT 6: हे कौन्तेय! आपल्या देहाचा त्याग करीत असताना, मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निःसंदेह प्राप्ती करतो.

TEXT 7: म्हणून हे अर्जुना! तू सदैव माझे (कृष्ण या रूपाचे) स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर केल्याने, तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल.

TEXT 8: हे पार्था! आपले मन विचलित होऊ न देता, त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून, माझे, परमपुरुषाचे जो ध्यान करतो, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो.

TEXT 9: मनुष्याने परमपुरुषाचे, सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालनकर्ता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे, अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत.

TEXT 10: जो मनुष्य, अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योगसामथ्र्याद्वारे अविचलित मनाने, पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत्-स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते.

TEXT 11: जे ॐकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे, ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो.

TEXT 12: सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून, मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो.

TEXT 13: योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ॐकाराचे उच्चारण करीत, जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते.

TEXT 14: हे पार्था!जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो, त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो. कारण, तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो.

TEXT 15: माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परम सिद्धी प्राप्त झालेली असते.

TEXT 16: प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वांत खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकांत वारंवार जन्म-मृत्यू होतात. परंतु हे कोंतेया! जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो.

TEXT 17: मानवीय गणनेनुसार, एक सहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक हजार चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते.

TEXT 18: ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात.

TEXT 19: पुनः पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो.

TEXT 20: याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही.

TEXT 21: वेदान्ती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमलक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय.

TEXT 22: सर्वाहून श्रेष्ठ असणा-या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे.

TEXT 23: हे भरतश्रेष्ठा! आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता, तो परतून येतो अथवा येत नाही, याचे मी तुला वर्णन करतो.

TEXT 24: जे परब्रह्माला जाणतात ते, अग्रिदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो, त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात.

TEXT 25: धूर, रात्र कृष्णपक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो.

TEXT 26: वैदिक मतानुसार, प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही; परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो.

TEXT 27: हे अर्जुना! भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो.

TEXT 28: जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम, शाश्वत धामाची प्राप्ती होते.

« Previous Next »