अध्याय पंधरावा
पुरुषोत्तम योग(परमपुरुषाचा योग)
TEXT 1: श्रीभगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे, ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो
TEXT 2: या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रियविषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानवसमाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत.
TEXTS 3-4: या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी, अंत, आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की, ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परम पुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे.
TEXT 5: जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते.
TEXT 6: त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत.
TEXT 7: बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत.
TEXT 8: ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुस-या देहात घेऊन जातो. अशा रीतीने, तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो.
TEXT 9: अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र,जिह्वा नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियविषय समूहाचा उपभोग घेतो.
TEXT 10: जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत; परंतु ज्याला ज्ञानचक्षू आहेत तो हे सर्व पाहू शकतो.
TEXT 11: प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगिजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात;परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत.
TEXT 12: अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते.
TEXT 13: मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो.
TEXT 14: सर्व प्राणिमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो.
TEXT 15: मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेहमी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.
TEXT 16: च्युत (क्षर) आणि अच्युत(अक्षर) असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते
TEXT 17: या दोहोंव्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत.
TEXT 18: मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे, जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.
TEXT 19: जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता! तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो.
TEXT 20: हे निष्पाप अर्जुना! हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो.