No edit permissions for मराठी

TEXT 10

bījaṁ māṁ sarva-bhūtānāṁ
viddhi pārtha sanātanam
buddhir buddhimatām asmi
tejas tejasvinām aham

बीजम्-बीज; माम्-मला; सर्व-भूतानाम्-सर्व प्राणिमात्रांचा; विद्धि-जाणण्याचा प्रयत्न कर; पार्थ-हे पार्था; सनातनम्-मूळ, शाश्वत; बुद्धिः-बुद्धी; बुद्धि-मताम्-बुद्धिमानांची; अस्मि-मी आहे; तेजः-शक्ती; तेजस्विनाम्-शक्तिमानांची; अहम्-मी.

हे पार्था! अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्वशक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण.

तात्पर्य: श्रीकृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहेत. चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत. पशू, पक्षी, मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चर प्राणी आहेत तर वृक्ष आणि वेली हे अचर आहेत, ते हलू शकत नाहीत, केवळ उभे राहू शकतात. एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत. त्यांपैकी काही चर आहेत तर काही अचर आहेत; परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज श्रीकृष्णच आहेत. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परम सत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो. श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत. ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, ब्रह्म हे परब्रह्मामध्ये स्थित आहे. म्हणून वस्तुतः श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत. श्रीकृष्ण हे मूळ आहेत. ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालन करतात. याची पुष्टी वेदामध्ये (कठोपनिषद् – २.२.१३) करण्यात आली आहे.

नित्यो नित्यांना चेतनश्चेतनानाम्‌
एको बहूनां यो विदधाति कामान्‌

ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहेत. ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात. मनुष्य बुद्धीशिवाय काहीही करू शकत नाही आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाही.

« Previous Next »