No edit permissions for मराठी

TEXT 13

tribhir guṇa-mayair bhāvair
ebhiḥ sarvam idaṁ jagat
mohitaṁ nābhijānāti
mām ebhyaḥ param avyayam

त्रिभिः—तीन: गुण-मयैः-गुणमय; भावैः-भावाद्वारे, एभिः—हे सर्व; सर्वम्-संपूर्ण; इदम्‌- हे; जगत्-प्राकृत जग; मोहितम्-मोहित झालेले; अभिजानाति-जाणीत नाही; माम्-मला; एभ्यः—त्यांच्यापेक्षा; परम्—परम, श्रेष्ठ, अव्ययम्—अव्यय किंवा अविनाशी.

त्रिगुणांनी (सात्विक, राजसिक आणि तामसिक) मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत, त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही.

तात्पर्यः संपूर्ण जगत प्रकृतीच्या तीन गुणांमुळे मोहित झाले आहे. त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाहीत की, भगवान श्रीकृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत.

भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात. प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणा-या मनुष्यांचे चार वर्ग असतात. जे सत्वगुणामध्ये असतात, त्यांना ब्राह्मण म्हटले जाते. रजोगुणात जे असतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाते. जे राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असतात, त्यांना वैश्य म्हटले जाते तसेच पूर्णपणे तमोगुणामध्ये असतात त्यांना शूद्र म्हटले जाते. यांच्यापेक्षाही खालच्या पातळीचे जे आहेत ते पशू होत. तथापि, या उपाधी कायमच्या नसतात. मनुष्य हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा इतर काहीही असला तरी त्याचे जीवन हे अनित्यच असते; परंतु जरी हे जीवन अनित्य असले आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी, मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो आणि म्हणून आपल्याला वाटते की, आपण अमेरिकन, भारतीय, रशियन किंवा ब्राह्मण, हिंदू, मुस्लीम इत्यादी आहोत. जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणा-या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की, या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत.

मनुष्य, देवदेवता, पशू इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांपैकी प्रत्येकजण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते. जे रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. संपूर्ण सौंदर्य, श्री, ज्ञान, बल, यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रुप पाहिल्यावर ते गोंधळून जातात. जर सत्वगुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत, तर रजो आणि तमोगुणी लोकांची व्यथा काय सांगावी? कृष्णभावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्णभावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत.

« Previous Next »