TEXT 37
vṛṣṇīnāṁ vāsudevo ’smi
pāṇḍavānāṁ dhanañ-jayaḥ
munīnām apy ahaṁ vyāsaḥ
kavīnām uśanā kaviḥ
वृष्णीनाम्-वृष्णींच्या कुळामध्ये; वासुदेवः-द्वारकावासी कृष्णा; अस्मि-मी आहे; पाण्डवानाम्-पांडवांमध्ये; धनङ्ग्यः-अर्जुन; मुनीनाम्-मुनींमध्ये; अपि-सुद्धा; अहम्-मी आहे; व्यास:-वेदांचे संकलनकर्ता व्यास महर्षी; कवीनाम्-सर्व विचारकांमध्ये; उशना-उशना; कवि:-विचारक किंवा तत्वज्ञ.
वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे.
तात्पर्य: श्रीकृष्ण हे आदिपुरुष भगवान आहेत आणि बलदेव हे त्यांचे प्रथम विस्तारित रूप आहे. श्रीकृष्ण आणि बलदेव हे दोघेही वसुदेव पुत्र म्हणून अवतीर्ण झाले. यास्तव या दोघांनाही वासुदेव म्हणता येते. दुस-या दृष्टीने विचार केल्यास, श्रीकृष्ण हे कधीच वृंदावन सोडून जात नसल्यामुळे इतरत्र आढळणारी त्यांची सर्व रूपे म्हणजे त्यांचे विस्तारच आहेत. श्रीकृष्णांचा निकष्टस्थ अंश असल्यामुळे वासुदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. आपण जाणले पाहिजे की, भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये उल्लेख केलेला वासुदेव म्हणजे बलदेव किंवा बलराम आहे. कारण सर्व अवतारांचा उगम त्याच्यापासून होतो आणि म्हणून तो वासुदेवांचेही एकमात्र उमगस्थान आहे. भगवंतांच्या निकटस्थ विस्तारांना स्वांश म्हणतात आणि अन्य प्रकारच्या विस्तांराना विभिन्नांश असे म्हणतात.
पांडुपुत्रांमध्ये अर्जुन हा धनंजय म्हणून विख्यात आहे. तो नरोत्तम आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. मुनींमध्ये व्यासदेव हे सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कलियुगातील जनसामान्यांसाठी त्यांनी वेदांचे अनेक प्रकारे विश्लेषण केले. व्यासदेव हे श्रीकृष्णांचे अवतार म्हणून जाणले जातात. यास्तव व्यासदेव हे श्रीकृष्णांचेच रूप आहे. कोणत्याही विषयांचे सखोल चिंतन करू शकणा-या व्यक्तींना कवी असे म्हणतात. कवींमध्ये उशना अर्थात, शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरू होते, ते अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी राजकारणी होते. याप्रमाणे शुक्राचार्य म्हणजे श्रीकृष्णांचीच आणखी एक विभूती आहे.