No edit permissions for मराठी

TEXT 35

bṛhat-sāma tathā sāmnāṁ
gāyatrī chandasām aham
māsānāṁ mārga-śīrṣo ’ham
ṛtūnāṁ kusumākaraḥ

बृहत्-साम—बृहत्साम नामक स्तोत्र; तथा—सुद्धा; साम्नाम्—सामवेदाच्या स्तोत्रात;  गायत्री— गायत्री मंत्र; छन्दसाम्-सर्व छंदांमध्ये; अहम्-मी आहे; मासानाम्-मासांमध्ये; मार्ग-शीर्ष:- मार्गशीर्ष मास; अहम्-मी आहे; ऋतूनाम्-सर्व ऋतूंमध्ये; कुसुम-आकरः-वसंत ऋतू

सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्ष (नोव्हेंबर, डिसेंबर) मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे.

तात्पर्य: भगवंतांनी यापूर्वीच सांगितले आहे की, वेदांमध्ये सामवेद मी आहे. सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपत्र आहे. यांपैकी बृहत्साम हे एक गानसूक्त आहे आणि त्याचा सूर अत्यंत मधुर आहे व मध्यरात्री हे गायले जाते.

          संस्कृतमध्ये काय करण्याकरिता ठरावीक नियम आहेत. आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्ताची रचना वाटेल तशी केली जात नाही. नियमबद्ध काव्यामध्ये, सुपात्र ब्राह्मणाद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र हा प्रमुख आहे. गायत्री मंत्राचा श्रीमद्भागवतात उल्लेख केलेला आहे. गायत्री मंत्र हा विशेषकरून भगवत्साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो भगवंतांचे रूप आहे. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांकरिताच हा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप करण्यामध्ये जेव्हा मनुष्याला सिद्धी प्राप्त होते तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य धामात प्रवेश करू शकतो. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी प्रथम मनुष्याने सत्वगुणामध्ये पूर्णपणे स्थित होणे आवश्यक आहे. गायत्री मंत्राला वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्व आहे, आणि गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी-अवतार असे समजले जाते. ब्रह्मदेव या मंत्राचे दीक्षागुरू आहेत आणि त्यांच्यापासून हा मंत्र गुरुशिष्य परंपरेने चालत येतो.

          सर्व महिन्यांत मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम मानला जातो, कारण त्या वेळी सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात. अर्थात, वसंत ऋतू हा सा-या जगामध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे, कारण वसंत ऋतूमध्ये कडाक्याचा उष्माही नसतो किंवा कडाक्याची थंडीही नसते आणि याचवेळी झाडांना पालवी फुटते, फळेफुले बहरून येतात. वसंत ऋतूमध्ये श्रीकृष्णांचे अनेक लीलोत्सवही साजरे केले जातात. म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतूंत अत्यंत आहाददायक ऋतू समजले जाते आणि हा भगवान श्रीकृष्णांचे प्रतीक आहे.

« Previous Next »