अध्याय सोळावा
दैवासुरसंपद्कविभागयोग(दैवी आणि आसुरी स्वभाव)
TEXTS 1-3: श्रीभगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्त्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण, हे भारता!दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात.
TEXT 4: हे पार्था! दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत.
TEXT 5: दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा! तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस.
TEXT 6: हे पार्थ!या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक.
TEXT 7: आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही.
TEXT 8: ते म्हणतात की, हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही.
TEXT 9: अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी, आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात.
TEXT 10: कधीही तृप्त न होणा-या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत, मोहित झालेले आसुरी लोक, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात.
TEXTS 11-12: इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशाप्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात.
TEXTS 13-15: आसुरी मनुष्य विचार करतो की, 'आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे’ माझ्यासारख्या बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.
TEXT 16: या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रियतृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात.
TEXT 17: आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता, अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात.
TEXT 18: मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक, आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणा-या भगवंतांचा द्वेष करतात आणि ख-या धर्माची निंदा करतात.
TEXT 19: जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनींत टाकीत असतो.
TEXT 20: हे कौंतेया! आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत, हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात.
TEXT 21: काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो.
TEXT 22: हे कौंतेया! जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारांतून सुटला आहे तो आत्म साक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो.
TEXT 23: जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही.
TEXT 24: म्हणून, मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिले. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल.