अध्याय चौदावा
गुणत्रयविभागयोग(त्रिगुणमयी माया)
TEXT 1: श्रीभगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्वमुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे.
TEXT 2: या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही.
TEXT 3: हे भारता! ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्त्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो; यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो.
TEXT 4: हे कोंतेय! भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे.
TEXT 5: भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन! जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो.
TEXT 6: हे अनघा अर्जुना! सत्त्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा । मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्त्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात.
TEXT 7: हे कोंतेया! असंख्य वासना आणि महत्त्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो.
TEXT 8: हे भारता! अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात.
TEXT 9: हे भारता! सत्त्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण, त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो.
TEXT 10: हे भारता! कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्त्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण, सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण, सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरु असते.
TEXT 11: जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्त्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो.
TEXT 12: हे भरतर्षभ! जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात.
TEXT 13: हे कुरुनंदन! जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूखपणा आणि मोह हे प्रकट होतात.
TEXT 14: जेव्हा मनुष्याचा सत्त्वगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो.
TEXT 15: जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशू योनीमध्ये जन्म धेतो.
TEXT 16: पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्त्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते; परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे.
TEXT 17: सत्त्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते.
TEXT 18: सत्त्वगुणी मनुष्य क्रमशः उध्र्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात, रजोगुणी मनुष्य पृथ्वीलोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरकलोकात अध:पतन होते.
TEXT 19: जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की, सर्व कर्माचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही कर्ता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणा-या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो,
TEXT 20: जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणा-या दु:खांतून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो.
TEXT 21: अर्जुनाने विचारले, हे प्रभो ! त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो?
TEXTS 22-25: श्रीभगवान म्हणाले, हे पांडुपुत्र! जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही; जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो; जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो; जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो; जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो; जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो; जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते.
TEXT 26: जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो.
TEXT 27: आणि, परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणार्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे.