अध्याय तेरावा
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग(प्रकृती, पुरुष आणि चेतना)
TEXTS 1-2: अर्जुन म्हणाला, हे कृष्ण! मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे.
श्रीभगवान म्हणाले, हे कोंतेया! या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते.
TEXT 3: हे भारत! मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. हे माझे मत आहे.
TEXT 4: आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक.
TEXT 5: क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेषकरून हे ज्ञान, सर्व कारण-परिणामांसहित वेदांत-सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे.
TEXTS 6-7: पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, दहा इंद्रिये आणि मन, पाच इंद्रियविषय, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते.
TEXTS 8-12: नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्म-संयमन, इंद्रियविषयांचा त्याग, मिथ्या अहंकाररहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. याव्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे.
TEXT 13: ज्ञेय, म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य-कारणांच्या पलीकडे आहे.
TEXT 14: सर्वत्र त्यांचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. याप्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे.
TEXT 15: परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे; पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे.
TEXT 16: परम सत्य हे सर्व चराचर प्राणिमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे, भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या, ग्रहणशक्तीपलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे.
TEXT 17: परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी, तोच सर्वांचा संहारकर्ताही असल्याचे जाणले पाहिजे.
TEXT 18: सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे.
TEXT 19: याप्रमाणे क्षेत्र (देह), ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले, केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो.
TEXT 20: भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात.
TEXT 21: प्रकृती ही सर्व भौतिक कार्य-कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.
TEXT 22: याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे-वाईट प्राप्त होते.
TEXT 23: तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो.
TEXT 24: जो, भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार यासंबंधीचे तत्व जाणतो, त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही,
TEXT 25: काहीजण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काहीजण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काहीजण निष्काम कर्माद्वारे करतात.
TEXT 26: असे इतरही आहेत, जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म-मृत्यूचा मार्ग पार करतात.
TEXT 27: हे भरतर्षभ!चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहात आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण.
TEXT 28: जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणा-या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की, नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो.
TEXT 29: जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो.
TEXT 30: जो मनुष्य पाहू शकतो की, भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मे करते आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो.
TEXT 31: जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक् स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते.
TEXT 32: जे अनादित्वाच्या दृष्टींनी युक्त आहेत ते पाहू शकतात की, अव्ययी आत्मा हा दिव्य, शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे. हे अर्जुना! भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करीतही नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही.
TEXT 33: आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही.
TEXT 34: हे भारता! ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव, चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो.
TEXT 35: जे ज्ञानचक्षूने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती होते.