No edit permissions for मराठी

अध्याय अकरावा

विश्वरूपदर्शनयोग(विश्वरूप)

TEXT 1: अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे.

TEXT 2: हे कमलनयना! जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी माहात्म्याची अनुभूतीही झाली आहे.

TEXT 3: हे पुरुषोत्तम! हे परमेश्वर! तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहात असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे.

TEXT 4: हे प्रभो ! मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा! तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा.

TEXT 5: श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! हे पार्था! आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णानी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा.

TEXT 6: हे भरतश्रेष्ठा! आदित्य, वसू, रुद्र आणि अश्विनीकुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पाहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पाहा.

TEXT 7: हे अर्जुना! तू जे काही पाहू इच्छितोस, ते आता माझ्या या देहामध्ये पाहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे.

TEXT 8: परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पाहा!

TEXT 9: संजय म्हणाला, हे राजा! या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले,

TEXTS 10-11: अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते.

TEXT 12: आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे  तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल.

TEXT 13: त्या वेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली, परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली.

TEXT 14: त्यानंतर, भ्रमित अणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला.

TEXT 15: अर्जुन म्हणाला, हे भगवन्! हे कृष्ण! मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सपांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो.

TEXT 16: हे विश्वेश्वर! हे विश्वरूप! तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या, असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही.

TEXT 17: तुमचे रूप अत्यंत तेज:पुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्यांच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहात आहे.

TEXT 18: तुम्ही परम आद्य, अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक, पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे.

TEXT 19: तुम्ही आदी, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहात आहे.

TEXT 20: तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन्! तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत.

TEXT 21: सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षिगण आणि सिद्धगण 'स्वस्ति' (शांती) असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत.

TEXT 22: रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनीकुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहात आहेत.

TEXT 23: हे महाबाहू!देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अक्राळविक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे.

TEXT 24: हे सर्वव्यापी विष्णू! अनेक तेजस्वी वर्णानी युक्त तुम्ही, आकाशास भिडलेली तुमची आ-वासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही.

TEXT 25: हे देवाधिदेव, हे जगत्रिवास! कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अक्राळविक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे.

TEXTS 26-27: स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काहीजण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे.

TEXT 28: ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत.

TEXT 29: ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहात आहे.

TEXT 30: हे विष्णू! तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी, सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहात आहे. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून, उग्र प्रखर होरपळणा-या किरणांनी प्रकट झाला आहात.

TEXT 31: हे देवाधिदेव! कृपया मला सांगा की, उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला प्रणाम करतो, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात, मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही.

TEXT 32: श्रीभगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्याव्यतिरिक्त (पांडवांव्यतिरिक्त) दोन्ही सैन्यांतील सर्व योद्धांचा विनाश होणार आहे.

TEXT 33: म्हणून ऊठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची! युद्धामध्ये तू केवळ निमित्तमात्र होऊ शकतोस.

TEXT 34: द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्धयांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील.

TEXT 35: संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन्! भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणा-या अर्जुनाने हात जोडून पुनः पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला.

TEXT 36: अर्जुन म्हणाला, हे हृषीकेश! तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे.

TEXT 37: हे महात्मन्! ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदिसृष्टिकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगत्रिवास! या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी, सर्व कारणांचे कारण आहात.

TEXT 38: तुम्ही आदिपुरुष भगवान, पुरातन, या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंतरूपा तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे.

TEXT 39: तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्रदेखील तुम्हीच आहात; तुम्ही  आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुनः पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो.

TEXT 40: तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंतवीर्य तुम्ही अपारशक्तीचे स्वामी आहात, तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात.

TEXTS 41-42: मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून, हे कृष्ण, हे यादव! हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेन त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी, चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत! माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा.

TEXT 43: तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरू तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता! त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल?

TEXT 44: प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुस-या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा.

TEXT 45: पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे; परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकूळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगत्रिवास! कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा.

TEXT 46: हे विश्वमूर्ते, हे सहस्रबाहो भगवान! मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख, चक्र, गदा, पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे.

TEXT 47: श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुन! मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्यावाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही.

TEXT 48: हे कुरुप्रवीर! तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही.

TEXT 49: माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस, आता हे रूप मी समाप्त करतो. हे मद्भक्ता! सर्व क्लेशांतून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांतचित्ताने पाहू शकतोस.

TEXT 50: संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला.

TEXT 51: अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे.

TEXT 52: श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! आता तू जे माझे रूप पाहात आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवतासुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात.

TEXT 53: तुझ्या दिव्य चक्षूद्वारे तू जे रूप पाहात आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही.

TEXT 54: हे अर्जना! मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्त्वात प्रवेश करू शकतोस.

TEXT 55: हे अर्जुना! जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संगातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्याप्रीत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो.

« Previous Next »